लातूर : राज्याचे कृषिमंत्री माणीकराव कोकाटे विधीमंडळ सभागृहात रम्मी खेळत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर चक्क पत्त्यांची उधळण करीत आंदोलन केले. त्यानंतर मंत्री कोकाटे यांची मंत्रीपदावरुन व पक्षातून तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनिल तटकरेंना निवेदन दिले. छावाच्या कार्यकर्त्यांनी लातूरच्या विश्रामगृहात हे आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची लातूर येथील औसा रोडवरील विश्रामगृहात सायंकाळी ७.३० पर्यंत पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी छावाच्या शेतकरी आघाडीचे विजयकुमार घाडगे व त्यांचे कार्यकर्ते तेथे आले. पत्रकार परिषद संपताच खासदार तटकरे मिंटीग हॉलमध्ये गेले. यावेळी 'छावा'च्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध व्यक्त करत तटकरेंसमोर पत्ते उधळत रोष व्यक्त केला.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला आधार देण्याऐवजी कृषिमंत्री चक्क सभागृहात पत्ते खेळत आहेत. विधीमंडळ सभागृह हे लोकप्रश्न मांडण्याचे ते सोडवण्याचे पवित्र स्थळ आहे, अशा ठिकाणी तुमच्या पक्षाचे मंत्री पत्ते खेळतात, असे म्हणत छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनिल तटकरेंना धारेवर धरले.
तुम्ही त्यांना मंत्री केले आहे. अशा असंवेदनशील माणसाला मंत्रीपदावर राहण्याचा कसालाही अधिकार नाही त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत छावाच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिले. पत्ते खेळायचे असतील तर त्यांच्या घरी बसून खेळण्यास सांगा, असे म्हणतही त्यांनी कोकाटेंविरोधात संताप व्यक्त केला.