Electricity Theft | वीज चोरी File Photo
लातूर

Chakur electricity theft case : कंत्राटदाराला वीजचोरी प्रकरण भोवले

एजन्सीला 17 हजारांचा ठोठावला दंड; गुत्तेदाराचे धाबे दणाणले, सर्वत्र चर्चा

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये सुरू असलेल्या नाली बांधकामासाठी सदरील कंत्राटदाराने चोरीची वीज वापरल्याचे भिंग पुढारीने बातमीच्या माध्यमातून फोडताच एमएसईबी प्रशासन खडबडून जागे होऊन, या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित एजन्सीवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्या एजन्सीला जवळपास 17 हजार रुपयाचा दंडही आकारण्यात आला आहे. यामुळे चाकुरातील अनधिकृत काम करणाऱ्या गुत्तेदाराला चांगलाच चाप बसला आहे.

चाकूर शहरात नगर पंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक 7 मध्ये अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकामासाठी एका एजन्सीने कोणतीही अधिकृत वीज परवानगी न घेता थेट विद्युत खांबावरून वीज जोडणी करून काम सुरू केल्याचे पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार उघडकीस आणून दिला होता.

याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना एमएसईबी प्रशासनाचे सहायक अभियंता मुखेडकर यांच्या निर्देशानुसार संबंधित ठिकाणी लाईनमन पाठवण्यात आला. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून गुत्तेदारास तत्काळ वीज वापरासाठी अधिकृत तात्पुरती परवानगी घेण्याच्या तसेच वापराचे बिल भरण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित गुत्तेदाराच्या एजन्सीला दंडापोटी 6,960 रुपये आणि तडजोडी अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची सदरील एजन्सीला नोटीस काढली आहे. या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले आणि गुत्तेदाराचे भिंग फोडून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची एमएसईबी प्रशासनाने दखल घेत तत्परता दाखविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कंत्राटदारांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याची चर्चा चाकूर शहरातून दबक्या आवाजात सुरु असलेली पाहायला मिळत आहे.

  • पुढारीतून बातमी प्रसिद्ध होताच सदरील एजन्सीवर तत्काळ कारवाई करत वीज चोरीचा प्रकार थांबविला. संबंधित एजन्सीच्या गुत्तेदारास दंडापोटी 6 हजार 960 रुपये आणि तडजोडी अंतर्गत 10 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश सहाय्यक अभियंता मुखेडकर यांनी दिले आले. त्यामुळे शहरातील सुरू असलेल्या इतर कामांमध्येही नियमांचे पालन करण्याबाबतचा इशारा मिळाला असून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT