चाकूर : राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चाकूर आणि लातूररोड बायपास, टी पॉईंटवर दिवसेंदिवस अपघात वाढले असून त्या अपघातात आठ दिवसांत चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याने ते ठिकाण अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरतोय.
राष्ट्रीय महामार्गांवर चाकूर बायपास आणि लातूर रोड बायपास टी-पॉईंटवर दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच असून चाकूर बायपासवर शनिवारी पुन्हा एकदा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातात
अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १०२०) भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून ( अलगरवाडी पाटी ) बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्धन काळबा येणगे वय ६० वर्षे व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येणगे वय ५५ रा.तेलगाव हे पती-पत्नी जागीच ठार झाले. या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर एम एच २४ बी आर ७१२१ कारवर जोरदार धडकले. वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे वय १६ वर्षे रा. शिरूर ताजबंद या तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने या धोकादायक ठिकाणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आठ दिवसापूर्वी वडवळ जवळील शंकरनगर तांडा येथील माजी उपसरपंच पंडित नामदेव पवार वय ५७ मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना लातूर रोड बायपास टी पॉईंटजवळ त्यांच्या मोटार सायकलला उड्डाणंपुलावरून येणाऱ्या भरधाव ऑटोने त्यांना जोरदार धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
लातूरहून नांदेडकडे गेलेला राष्ट्रीय महामार्ग अतिशय भयावह ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गांवर दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. ती अपेक्षित असलेली ठिकाणे सोडून दुसरीकडेच केल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. चाकूर आणि लातूर रोड बायपास, टी पॉईंटवर दुचाकीवरून जाणारे नागरिक रस्ता ओलांडून जाताना पूर्णपणे गोंधळून जातात. यामुळे तेथे अपघात होत आहेत.
चाकूर आणि लातूर रोडचा उड्डाणंपूल जवळपास एक ते सव्वा किलोमीटरचा उभारण्यात आलेला आहे. चाकूरला बायपास अलगरवाडी पाटीजवळ उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. परंतु तेथे उड्डाणपूल न झाल्यामुळे त्या बायपास टी पॉईंटवर राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तो रस्ता अतिशय धोकादायक ठरत आहे. तेथून रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. कारण नांदेडहून येणाऱ्या वाहनाचा वेग उतारामुळे भरधाव असतो. त्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात अपघात होत आहेत.
याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने अपघात होऊ नये या दृष्टीने कुठलीच नियमावली नागरिकांच्या हितासाठी वापरली नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, वेग नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा नसणे आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्थानिकांनी चाकूर बायपास व लातूररोड टी पॉईंटवर उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्यावर ठोस कार्यवाही झाली पाहिजे. परिणामी या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच राहणार आहे.
दरम्यान रविवारी सकाळी ८ च्या सुमारास त्या अपघात स्थळापासून काही अंतरावरच दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला असून त्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
तालुक्यातील नांदगाव नंतर चाकूर- लातूर रोड बायपास टी पॉईंट हा मोठा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून दिवसेंदिवस ओळखला जात आहे. भविष्यात याठिकाणचे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.