चाकूर : तालुक्यात शुक्रवारी (दि.२६) रात्री झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव तुडुंब भरून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.
चाकूर तालुक्यात पावसाने कहर केला असून शुक्रवारी ९४. ८ मी.मी पाऊस झाला. चाकूर शहरात अनेक घरामध्ये पावसाचे पाणी शिरले असून मुख्याधिकारी लंबे यांच्या सूचनेने २० कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. त्या कुटुंबाना नगरपंचायत येथील हॉलमध्ये निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढले आहे. त्यामुळे खेडे गावांतून येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. चाकूर ते आटोळा रस्त्यावरील रेल्वेपूल पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणी असणाऱ्या शेतात पाणी शिरून शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.
शेळगांव येथील तिरू नदी ओसंडून वाहू लागली असून संगमवाडी आणि बोथी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले आहे. शिरनाळ, आनंदवाडी, नायगाव, नळेगाव, रोहिणा,जानवळ, चापोली आणि झरी या भागातील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.खेडेगावातून तालुक्यात येणाऱ्या दूधाला पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यात अनेक भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून नळेगावहून हुकाचीवाडी आणि हटकरवाडी जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तालुक्यातील खरीपाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. तोंडचा घास हातातून गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.