प्रातिनिधिक छायाचित्र. pudhari photo
लातूर

NEET Paper Leak Case : मोटेगावकरचा मुलगा चौकशीच्या फेऱ्यात

दोन डॉक्टरांची पेपरफुटीच्या संशयावरून लातुरात झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

लातूर : नीट पेपर फुटीप्रकरणी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतरही त्यांच्या लातूर येथील क्लासेसची झाडाझडती सुरूच असून सीबीआयच्या पथकाने मंगळवारीही या कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, पुणे येथे मोटेगावकर यांचा मुलगा, अन्य तीन विद्यार्थी, पालकांची सीबीआयने चौकशी केली.

नालंदा कॅम्पस नावाने असलेल्या या इमारत परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या तपासणीत नेमके काय पहाण्यात आली याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. तथापि शिवराज मोटेगावकर हे सध्या सीबीआयडीच्या कोठडीत असून या प्रकरणाचे बरेच धागेदोरे लातूर शहरात असल्याने तेथून सीबीआयला तपासाच्या दृष्टीने माहिती लागेल ती मिळण्यासाठी लातुरात सीबीआयचा मुक्काम वाढल्याची चर्चा आहे.

तपासात समोर येणाऱ्या बाबींवरूनही चौकशीचा विस्तार वाढू शकतो. दरम्यान औसा रोडवरील दोन डॉक्टरांची सीबीआयने मंगळवारी दुपारी चौकशी केली. त्यात एक बालरोग तज्ञ आहेत. या शिवाय अन्य दोन डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहे. नवीन नावे आढळली व आवश्यकता भासली तर त्याचीही चौकशी होऊ शकते.

दरम्यान प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलासह अन्य तीन विद्यार्थी व पालकांची चौकशी पुणे येथे सीबीआयने केली असून या विद्यार्थ्यांना नीटमधील प्रश्न परीक्षेपूर्वीच मिळाल्याची चर्चा लातूर शहरात होती.

बीडमधील कोचिंग क्लासेसही रडारवर

शशी केवडकर

बीड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत आले असल्याची माहिती आहे. मूळ बीडचे रहिवासी असणाऱ्या प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर सीबीआयने बीडमधील काही कोचिंग क्लासेसची चौकशी केल्याचे समजते.

कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या मोबाईल कॉल रेकॉड्‌‍र्स, आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी संपर्क आणि कोचिंग नेटवर्कची साखळी तपासताना बीडमधील काही कोचिंग क्लासेसची नावेही तपासाच्या कक्षेत आल्याचे कळते. मागील दोन दिवसांपासून सीबीआयची दोन स्वतंत्र पथके बीड शहरात तळ ठोकून असून शहरातील प्रमुख नीट-जेईई कोचिंग क्लासेसवर त्यांचे विशेष लक्ष असल्याचे समजते.

सीबीआयच्या एका पथकाने शहरातील उमाकिरण परिसरातील काही क्लासेसमध्ये जाऊन सविस्तर चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी, फी व्यवहार, बाहेरील जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची माहिती, तसेच शिक्षकांच्या संपर्क साखळ्यांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी डिजिटल डेटा, मोबाईल संपर्क आणि जुन्या बॅचची माहितीही मागवण्यात आली असून मागील वर्षी 700 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा डाटा घेत चौकशी झाल्याचे कळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT