BJYM Vice-President murdered over land dispute
किनगाव, पुढारी वृतसेवा अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील शेतशिवारात जमीनविषयक जुन्या वादातून ३५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. गोविंद सोपानराव मुंगे (वय ३५) असे मृताचे नाव असून तो भाजप युवा मोर्चाचा अहमदपूर तालुका उपाध्यक्ष होता. या घटनेने गुंजोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजोटी येथील रहिवासी गोविंद मुंगे याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी शेतात आढळून आला. सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. गोविंद हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा तसेच कुटुंबाचा यकर्ता असल्याने त्याच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
मृताची आई कमलबाई सोपान मुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नारायण देशमुख, रवि देशमुख, शामराव देशमुख आणि अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध आरोप करण्यात आला आहे.
जमीनविषयक जुन्या वादातून आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून गोविंद याच्या हातावर व पायावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आणि त्याचा जीव घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गोविंद यांचे शवविच्छेदन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी गुंजोटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच लातूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी किनगाव पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले, पोलिस निरीक्षक बावकर, सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके, पोलिस उपनिरीक्षक वल्लमपल्ले व तोंडारे उपस्थित होते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे करीत आहेत.