BJP rally today in the presence of MP Chavan
लातूर, पुढारी वृतसेवा : भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष यांचा जाहीर सत्कार आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. आशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबर रविवारी दुपारी ३ वाजता लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री बस्वराज पाटील मुरूमकर आणि लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजितसिंह पाटील कव्हेकर यांची नुक्तीच प्रदेश भाजपा पक्षश्रेष्ठीच्या वतीने निवड करण्यात आली असून त्यांचा लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते खा. आशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार असून या सत्कार सोहळयाच्या निमित्ताने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड राहणार आहेत.
राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हायाचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमूख यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनी बहूसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन मतदार संघातील भाजपाचे मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, प्रताप पाटील, सुरज शिंदे, शरद दरेकर आणि उध्दव काळे यांनी केले आहे.