अहमदपूर : पूर्वापार चालत आलेली पिण्याच्या पाण्याची विहीर खुली करावी या प्रमुख मागणीसह त्या संदर्भातील इतर मागण्यासाठी बेंबडेवाडी, ता. अहमदपूर येथील ग्रामस्थांनी डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.
मागच्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी विहिरीवर मज्जाव केला जात आहे, त्यामुळे पाणी मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या असल्या तरी अद्याप काही उपाययोजना झालेल्या नाहीत त्यामुळे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
विहिरीची नोंद सातबाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करून विहीर सार्वजनिक नोंदविण्यात यावी, विहिरीतून तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना याच विहिरीवरून मंजूर करावी, विहिरीला जाण्यासाठी गाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा, बेंबडेवाडी तळ्याच्या क्षेत्रातील बुडीत क्षेत्र 7/12 वरून कमी करून प्रत्यक्षत तळ्याची जागा शासनाने ताब्यात घ्यावी. या मागण्याही यावेळी करण्यात आल्या व मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.