Renapur fodder crisis pudhari photo
लातूर

Renapur fodder crisis : वाळलेला कडबा सात हजार रुपये टन

रेणापूर : शेकडा पेंडीचा दर तीन ते अडीच हजार रुपये; दुधाचे भाव मात्र जैसे थे!

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून वाळलेला ज्वारीचा कडबा सहा ते सात हजार रुपये टन या दराने (सहा ते सात रुपये प्रति किलो) विकला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. वाळलेल्या ज्वारीच्या एका पेंडीचा भाव 35 ते 40 रुपये झाला आहे.

दोन - तीन वर्षापासून शेतमाला प्रमाणेच ज्वारीचा कडबा किलोवर विकला जात असल्यामुळे लहान मोठ्या पेंडीचा वाद राहिला नाही. वाळलेल्या कडब्याबरोबरच मक्याचा हिरवा चाराही महागला आहे जसे चाऱ्याचे भाव वाढत आहेत तसे दुधाचे भाव मात्र त्यामानाने वाढत नाहीत. त्यामुळे दुग्धउत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घरपोच वाळेला कडबा मिळू लागल्याने पशुपालकांना कडब्यासाठी बाजारपेठेत जाण्याची गरजच उरली नाही.

मागील वर्षी वाळलेला कडबा 25 ते 30 रुपये पेंडी तर हिरव्या चाऱ्याची एक पेंडी 40 ते 50 रुपयाला मिळत होती. मात्र यावर्षी या दोन्हीचे भाव कमालीचे वाढलेले आहेत. अवकाळी वादळी पावसामुळे ज्वारी आडवी पडून कडब्याचे मोठे नुकसान झाले परिणामी रेणापूर तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे दुग्ध व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे पशुधन ठेवावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी वाळलेला कडबा पाच हजार रुपये टन होता. एक पेंडी तीस ते पस्तीस रुपयांना मिळत होती. या वर्षी तोच कडबा सहा ते सात हजार रुपये प्रति टनांपर्यंत पोचला आहे. चारा म्हणून हरभरा व सोयाबीनच्या गुळ्याचा वापर पशुपालक करीत होते.परंतु पावसाने भिजून हा चारा जनावरांना खाण्यायोग्य राहिला नाही. रेणापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून संकरित ज्वारीचा पेरा कमी झाल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय मर्यादित झाला आहे. एका दुभत्या जनावराला दिवसाकाठी किमान दोन - तीनशे रुपयांचा चारा लागतो. हजारो लिटर दूध डेअरीला घालणारा रेणापूर तालुका दुग्ध व्यवसायात मागे पडला आहे. कडब्यासोबतच सरकी पेंड, सुग्रास व इतर पशुखाद्याचे दरही कमालीचे वाढत आहेत. पूर्वी कडबा शेकड्यावर विकला जायचा लहान - मोठ्या पेंडीवरून वाद व्हायचे परंतु आता तो वजनावर विकला जात असल्याने लहान - मोठ्या पेंडीचा वादच शिल्लक राहिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT