लातूर : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ३५ हजार ९०० रुपयांची रोकड, ११ मोबाईल, दोन चारचाकी वाहने आणि पाच दुचाकी, असा एकूण १८ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरी ते तगरखेडा रस्त्यावरील रमेश थेटे यांच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३१ ऑक्टोबर रोजी पथकाने छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कारवाईत ३५ हजार ९०० रुपयांची रोकड, ११ मोबाईल, दोन चारचाकी वाहने आणि पाच मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.