Aurad Cloudburst
औराद शहाजानी : औराद शहाजानीसह परिसरात रविवारी (दि.१४, सप्टेंबर) सायंकाळी एक तासात ५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सायंकाळी ५:०० वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर ६:०० ते ७:०० वाजेपर्यंत अत्यंत जोराचा पाऊस झाला.
जून महिन्यापासून आतापर्यंत ५८९ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर झाल्याची माहिती मुक्रम नाईकवाडे यांनी दिली. आपल्या भागातील पावसाची सरासरी ७५० ते ८०० मिलीमीटर आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून रविवारी सायंकाळी ढगफूटीसदृश पाऊस होऊन एक तासात ५६ मिलीमीटर पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अति पाऊस हिरावून घेत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पावसाने बांध फुटले असून अनेकांच्या शेतातील पिके व माती वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. पावसाच्या जोरामुळे अनेक घरे व दुकानात पाणी शिरले होते. तसेच लातूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरूनही पाणी वाहत होते.
अनेक ओढ्या-नाल्यांना पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. तगरखेडा - औराद शहाजानी, वांजरखेडा - औराद शहाजानी या रस्त्यावरील पूलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता काही काळ बंद होता.
सततच्या पावसामुळे औराद शहाजानी येथील बंधाऱ्यात पाणी वाढले आहे. तसेच माकणी व धनेगाव धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे मांजरा व तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे रात्रीच औराद शहाजानी व तगरखेडा येथील बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.