चाकूर : तालुक्यातील आष्टा येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नी व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून 16 तारखेपर्यंत दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.
खुनाच्या घटनेमुळे आष्टा गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शमशोद्दीन जैनोद्दीन शेख (वय 40, रा. आष्टा ता. चाकूर) यांचा दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 ते 11 फेब्रुवारी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी मारहाणीत मृत्यू झाला. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून कोणत्यातरी जाड वस्तूने डोके, पाठ, तोंड तसेच हात-पायांवर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीमुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जैनोद्दीन घुडुसाहेब शेख (वय 60, रा. आष्टा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 72/2026, कलम 105, 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पत्नी नसरीन शमशोद्दीन शेख (वय 35) व मुलावर आरोप ठेवण्यात आले असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान दोघांनाही न्यायालयांसमोर हजर केले असता पत्नी व मुलाला 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. टी. चव्हाण करीत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेने आष्टा गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.