Anxiety about survival has grown under the shadow of Draught
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यासह आष्टी परिसरात यंदा पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक दुहेरी नव्हे तर तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही या भागात एकदाही समाधानकारक मुसळधार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या जगण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढविल्याने आर्थिक कंबरडे मोडले आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. मात्र पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी केली असली तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. दुसरीकडे साखर, खाद्यतेल, शेंगदाणे, तूरडाळ, मूगडाळ, उडीद डाळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. किराणा साहित्याच्या वाढत्या दरामुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले असून रोजच्या गरजा भागवितानाही मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी झाल्याने आष्टी व परिसरातील अनेक तरुण रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि इतर मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे गावांमधील आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि वाढती महागाई या तिहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत-
शासनाने महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई आणि रोजगारनिर्मितीच्या उपाययोजना राबवाव्यात, तसेच गरीब व गरजू कुटुंबांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.