अहमदपूर : राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पार पडली. या सोडतीत अहमदपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठरले आहे. शहरात विविध राजकीय पक्षांचे प्रभावशाली नेते आणि कार्यकर्ते असल्याने या वेळी निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अहमदपूर नगरपालिकेची स्थापना १९५२ साली झाली असून सुरुवातीस ती ‘क’ दर्जाची होती. २०१२ साली नगरपालिकेला ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला संवर्गासाठी आरक्षित होते, आणि त्या वेळी अश्विनी लक्ष्मीकांत कासनाळे यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. २०१७ ते २०२२ या कालावधीत त्यांनी नगरपालिकेचा कारभार पाहिला.
१० मार्च २०२२ रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. सध्या उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत, तर मुख्याधिकारी संतोष लोमटे प्रशासनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
आगामी पंचवार्षिक निवडणुकीत अहमदपूर नगरपालिकेसाठी १२ प्रभागांतून २५ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहरातील अनेक नवीन इच्छुक पुढे येण्यास उत्सुक असून, या वेळीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.