"मरावे परी कीर्ती रूपी उरावे: भावेश तिवारीला अवयवदानाने अमरत्व" File Photo
लातूर

"मरावे परी कीर्ती रूपी उरावे: भावेश तिवारीला अवयवदानाने अमरत्व"

Organ Donation | मृत्यूनंतरही अवयवदानामुळे जिवंत

पुढारी वृत्तसेवा

औसा, पुढारी वृत्तसेवा

"मरावे परी कीर्ती रुपी उरावे" या उक्तीला सार्थ ठरवत लातूरच्या १८ वर्षीय भावेश संतोष तिवारी याने मृत्यूनंतरही चार जणांना जीवदान दिले आहे. लातूरच्या काळे गल्लीत राहणारा भावेश रंगपंचमीच्या दिवशी आपल्या आईला सत्संगला घेऊन जात असताना वासनगाव पाटीजवळ त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला.

या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचारांसाठी त्याला लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले. तब्बल ९ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर गुरुवारी डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले आणि भावेशने जगाचा निरोप घेतला.

तिवारी कुटुंबावर हा मोठा आघात होता. अशा कठीण क्षणीही, डॉक्टरांनी अवयवदानाच्या संकल्पनेची माहिती दिल्यावर वडील संतोष तिवारी व कुटुंबीयांनी समाजासाठी एक महान निर्णय घेतला.

आपल्या प्रिय पुत्राला गमावल्याचे दुःख बाजूला ठेवत, त्याच्या अवयवांच्या माध्यमातून इतरांना जीवनदान देण्याचा अत्यंत प्रेरणादायी निर्णय त्यांनी घेतला. भावेशच्या डोळे, किडनी आणि लिव्हरचे दान करण्यात आले, ज्यामुळे तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. यामुळे भावेश आपल्या अवयवांच्या माध्यमातून कायम जिवंत राहणार आहे. तिवारी कुटुंबीयांच्या या महान त्यागामुळे त्यांचा लाडका मुलगा काहींमध्ये नवी आशा बनून उरेल.

भावेश जरी जगातून निघून गेला असला, तरी त्याच्या या उदात्त कार्यामुळे त्याचे नाव कायम सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. वडील संतोष तिवारी यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, संपूर्ण समाजासाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT