लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, निलंगा, औराद शहाजानी आणि उदगीर परिसरातही रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे दीड, सव्वादोन, सव्वातीन आणि चार वाजेच्या सुमारास चार वेळा कंपन जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, १९९२ पासून आतापर्यंत १२१ सौम्य धक्के बसल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापनाकडे झाली आहे.
औराद शहाजानी व परिसरातील काही गावांमध्ये घरातील भांडी, पत्रे आणि खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात जाणवलेले धक्के हे हिंगोली परिसरातील भूकंपाचेच परिणाम होते, असे डॉ. उस्मानी यांच्या माहितीनुसार, १९९२ पासून आजपर्यंत किल्लारी, औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये भूकंपाची नोंद झाली आहे.
दरम्यान, निलंगा व किल्लारी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून सौमय झटके जाणवत आहेत. या घटनांमागील कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी निलंगा तालुक्यातील हासोरी गावातही अशाच प्रकारचे धक्के जाणवले होते. सुरुवातीला ते भूकंपाचे नसल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर विद्यापीठातील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी करून ते सौम्य भूकंपाचे धक्के असल्याचा अहवाल दिला होता.
अशा घडना घडल्यानंतर संशोधनाबाबत तेवढ्यापुरती चर्चा होते, नंतर त्याचा शासन प्रशासनाला विसर पडतो. काही वर्षांपासून बसत असलेले धक्के पहाता मराठवाड्यातील भूगर्भीय हालचालींचा सातत्याने अभ्यास करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे.
भूकंपाची चर्चा अधिक
लातूर जिल्ह्याने १९९२ साली मोठा भूकंप अनुभवल्यामुळे देशात कुठेही भूकंपाचे धक्के जाणवले तर, त्याची नोंद लातुरातील भूकंपमापक यंत्रावर होते. हिंगोलीतील नोंदही झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री सौम्य धक्के बसले. त्याची तीव्रता कमी असली तरी भूकंपाची चर्चा दिवसभर चालूच होती
पूर्णत कुत्रे पळत सुटले
पूर्णा तालुक्यालाही सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर कुत्रे भुंकत सैरावैरा पळत होते, अशी क्लिप व्हायलर झाली आहे. काही पशू जनावरे देखील भयभीत होवून इकडे तिकडे पळाली. पूर्णा तालुका पांगरा शिंदे पासून जवळ असल्याने त्या भागात धक्का जाणवल्यानंतर त्याची तीव्रता पूर्णत जाणवते.