मराठवाडा

ललिता पंचमीला माहूर रेणुकानगरी लाखों भाविकांनी गजबजली

अविनाश सुतार

श्रीक्षेत्र माहूर; पुढारी वृत्तसेवा: ललिता पंचमीला श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहूर गडावर शुक्रवारी (दि.३०) भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, चंद्रकांत रिठ्ठे व शुभम भोपी यांनी नित्य पूजा विधी आटोपून श्री रेणुका मातेला फळांची आरास घातली. यावेळी विश्वस्त संजय काण्णव, विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी, अरविंद देव, आशिष जोशी व बालाजी जगत यांची उपस्थिती होती.

नवरात्रीतील मागील पाच दिवसांत पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आनंद जोशी यांनी अभंग गाऊन माते चरणी सेवा अर्पण केली. पं. नितीन जयसिंगराव धुमाळ (शहेनाई वादक), सुनील ठोंगळे (तबलावादक), अमोल वाडेकर (संवादिनी), शुभम उकाई (गिराड) यांच्या संचाने शहनाईवर भीमपलासी रागातील 'जय दुर्गे दुर्गति परिहारिणी ही धून वाजवली.

संभाजीनगरच्या श्री जगदंबा भजनी मंडळाच्या प्रशांत अन्नदाते (गायक), विलास कुळकर्णी (हार्मोनियम), गणेश चौधरी, पदमाकर कुळकर्णी, नरेश महाजन (तबलावादक) यांनी माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली (अभंग) व नदीच्या पल्याड आईचा डोंगर हे भक्तीगीत गाऊन उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. प्रवीण कठाळे (पुसद) यांच्या राष्ट्रीय दिव्यांग संघ या भजनी मंडळातील अंध गायकांनी व नांदेड येथील लेबर कॉलनीतील महिलांच्या पद्मजा भजनी मंडळाने टाळ, डफली व झांज वाजवत अनेक भजन गाऊन माते चरणी सेवा अर्पित केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT