मराठवाडा

हिंगोली : कहाकर बु. येथील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनला यश

backup backup

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथे एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईनला (१०९८) गोपनीय माहिती मिळाली. या दरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. नगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार गोरेगाव पोलीस स्टेशन येथील सहा. पोलीस निरीक्षक आर.एम. हुंडेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषेराव राठोड यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक स्वप्नील दिपके यांनी घटनास्थळी भेट देऊन उपस्थित सर्वाना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते.

तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडीलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी कहाकर (बु.) येथील उपसरपंच मधुकर कांबळे, पोलीस पाटील एस.पी. भोणे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी जी.डी. काकडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय पोपळघट आणि बालिकेच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. सदर बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत बाल कल्याण समितीकडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्या संदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती, सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती मा.बाल कल्याण समिती यांना कळविण्यात येते आणि बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT