भोकरदन : भोकरदन जालना रोडवरील डावरगाव पाटीजवळ १९ ऑक्टोबर रोजी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे गुढ उलगडले असून दारूच्या नशेत किरकोळ वादातून मामा व मावसभावाने या तरूणाच खून केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोघांनी अटक केली.
परमेश्वर सुभाष लोखंडे (वय २६, मूळ रा. चिकलठाणा, ह.मु. पोस्ट ऑफिस परिसर, भोकरदन) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून याप्रकरणी मामा अनिल विश्वनाथ कांबळे व मावसभाऊ अर्जुन रावसाहेब रामफळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, १८ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हे तिघेजण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दारूच्या दुकानात एकत्र बसून मद्यपान करत होते. त्यादरम्यान मृत परमेश्वर आणि अर्जुन रामफळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मामा अनिल कांबळे यांनी दोघांना दुचाकीवरून घरी आणले. मात्र, वाद वाढत गेला आणि हातघाईत मारहाण झाली. यामध्ये दंडुक्याने झालेल्या मारहाणीत परमेश्वर याचा जागीच मृत्यू झाला.
हा गुन्हा लपविण्यासाठी तरूणाचा मामा व मावसभावाने रात्री दोनच्या सुमारास तरूणाचा मृतदेह भोकरदन जालना रस्त्यावरील वालसा डावरगाव पाटील जवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सकाळी आठ वाजता पोलिसांना रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक पवन राजपूत, भास्कर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
तरूणाच्या शरीरावर वर्ण आढळून आल्याने मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार तपास करून गुप्त माहितीच्या आधारे मामा व मावसभावाला ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता आपणच किरकोळ वादातून तरूणाचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर पोलीस निरीक्षक किरण बिडवे उपनिरीक्षक पवन राजपूत भास्कर जाधव यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
मृत परमेश्वर लोखंडे हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरातील रहिवासी आहे. मात्र, पत्नी माहेरी दिल्ली येथे गेल्याने तो काही दिवसांपासून मावशीकडे वालसा डावरगाव येथे राहत होता. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून त्याचा बळी घेण्यात आला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवनसिंग राजपूत हे करीत आहेत.