Shahagad Domalgaon Youth Drowns in Godavari River
शहागड : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील २ तरुण गोदावरी नदीत पोहत होते. यावेळी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि.३१) सकाळी ९ वाजता घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (वय १९, रा. डोमलगाव, ता. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोमलगाव येथील महाविद्यालयीन तरुण ज्ञानेश्वर खराद मित्रासह गोदावरी नदीच्या पात्रात पोहोचण्यासाठी गेला असता, बेसुमार अवैध वाळू उत्खननमुळे गोदापात्रातील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज आला नसल्याने ज्ञानेश्वर खराद हा बुडाला. तो वर आलाच नाही.
त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. त्यानंतर ज्ञानेश्वर खराद हा बुडाल्याची माहिती दुसऱ्या तरुणाने गावात सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्राकडे धाव घेतली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पटीचे पोहणारे ग्रामस्थ व मासेमारी करणारे तरुण गोदावरी पात्रात उतरले. तब्बल दोन तासांच्या शोध कार्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वर बारावी परीक्षेत पास झाला आहे. पुढील शिक्षणासाठी त्याची तयारी सुरू होती. त्याला दोन बहिणी आहेत.