Ambad Ghungarde Hadgaon Suspect Arrested
शहागड : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
घुंगर्डे हदगाव येथील जगन अश्रुबा काकडे यांच्या शेतातील आखाड्यावर त्यांचा मोठा मुलगा तुकाराम जगन काकडे (वय २६) याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, किरण हावले यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
प्राथमिक चौकशीदरम्यान मयत तुकाराम हा दारूच्या नशेत आई-वडील आणि भावाला शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची माहिती समोर आली. या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन काकडे (वय २२) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. प्राथमिक तपासात २६ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून तुकारामचा खून केल्याच्या प्रकरणात रामेश्वरचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार बालाजी पदमाने, हावले, सिद्दीकी, भोजने, भवरे आणि खरात यांनीही सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.