World Rabies Day: 3 thousand 385 people were bitten by dogs in five months
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यात ३ हजार ३८५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्र्याच्या चाव्या व्यतिरिक्त मांजरीने २३९, माकडाने १०तर इतर प्राण्यांनी ६९१जणांना याच कालावधीत चावा घेतला आहे. प्राण्यांनी चावा घेतलेल्या नागरीकांवर ए.आर.व्ही. इंजेक्शन व औषधोपचार करण्यात आले असुन सुदैवाने यात कोणाचाही मृत्यु झालेला नाही.
रेबीज या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात येतो. डॉ. लुईस पाश्चर फ्रेंच सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांनी रेबीज प्रतिबंधात्मक लस शोधून काढली. त्यांची पुण्यतिथी २८ सप्टेंबरला असल्यामुळे या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात येतो. २००७पासुन जागतिक रेबीज दिन जगामध्ये साजरा करण्यात येतो. या वर्षी १९ वा जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात येत आहे. या वर्षाचे घोषवाक्य "Strong Together" आहे. रेबीज हा रोग झाल्यानंतर मृत्यू अटळ आहे. रेबीज हा आजार प्राणी जन्य आजार आहे.
संक्रमित कुत्रे, मांजर, माकड इ. प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज हा रोग होतो. या प्राण्याच्या लाळेमध्ये विषाणु असतात. प्राणी चावतांना जखम झाल्यावर लाळेमधील विषाणु मानवाच्या शरीरामध्ये प्रविष्ठ होतात. सदरील विषाणु मेंदु पर्यंत पोहचल्यांनतर उपचार करणे अशक्य आहे. जगभरात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरीक रेबीजमुळे मृत्यू पावतात.
बऱ्याचदा रेबीज रुग्णांचे निदान होत नाही. त्यामुळे खरी आकडेवारी खुप जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात रेबीजचे प्रमाण हे जगाच्या एकुण रेबीज केसेस् पैकी ३६.१ टक्के आहे. लहान मुलांमध्ये कुत्रा चावण्याचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शालेय विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
यासाठी रेबीज बाबत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य, चर्चासत्र, कार्यशाळा घेऊन जनजागृती होणे आवश्यक आहे. पाण्यापासुन भित्ती, ताप, डोकेदुःखी, झोप न येणे, पक्षघात, घाबरणे, लाळ जास्त प्रमाणात येणे ही रेबीज आजाराची प्राथमीक लक्षणे आहे.
पाणी व साबणाने जखम १५ मिनिटे स्वच्छ धुणे, जखमेवर आयोडिन लावणे, ए.आर.व्ही.चे इंजेक्शन देण्यांत आलेल्या डोस प्रमाणे घेणे. शासकिय रुग्णालयात मोफत देण्यांत येतात. कुत्रा पाळीव किंवा मोकाट व पिसाळलेला आहे याची खात्री करणे. यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.डॉ. जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जालना