जालना : लहान मुलीने पाण्याच्या बादलीत हात टाकल्याच्या क्षुल्लक कारणावरून जुन्या वादाची कुरापत काढून जाऊ आणि दिराने मिळून एका ३६ वर्षीय महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कानडी बस्ती, रामनगर भागात घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी दीर आणि जावेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मनोज नरेंद्र राऊत आणि पूजा मनोज राऊत (दोन्ही रा. कानडी बस्ती, रामनगर, जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पीडित गृहिणी नेहा अर्जुन राऊत यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा राऊत आणि आरोपी हे दोन मजली घरात कौटुंबिक वादासह एकत्र राहतात. रविवारी (दि. २१) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेहा यांनी पाण्याची मोटार सुरू केली. मोटारला पाणी येत नसल्याने त्यांची जाऊ पूजा ही बाहेरून पाण्याच्या बादलीत पाणी घेऊन आली. दरम्यान, नेहा यांच्या लहान मुलीने त्या बादलीतील पाण्यात हात टाकला.
याच कारणावरून चिडलेल्या पूजाने नेहा यांना अश्लील शिवीगाळ करत, त्यांचे केस धरून चापटबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याच वेळी दीर मनोज राऊत याने वस्तूने मारून नेहा यांच्या डाव्या भुवईवर गंभीर दुखापत केली, तसेच पतीसह त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी नेहा यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष तुकाराम पवार पुढील तपास करत आहेत