Jalna Water Crisis pudhari photo
जालना

Jalna Water Crisis : सत्यम नगरमधील 400 ते 500 घरांचा संताप अनावर

भर उन्हात महिलांचे रिकाम्या हंड्यांसह आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

जालना : एकीकडे जालना शहर स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे चंदनझीरा परिसरातील सत्यम नगरमधील नागरिक मागील तब्बल तीन वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकत असल्याची संतापजनक परिस्थिती समोर आली आहे. परिसरातील तीन ते चार गल्ल्यांमधील सुमारे 400 ते 500 घरांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“सर्व निवडणुका झाल्या. आमदार, खासदार, नगरसेवक सर्वांनी आश्वासनांची खैरात केली; मात्र तीन वर्षांपासून नळ कोरडेच आहेत. मग नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा विभागाने मुख्य रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिन्यांपूर्वी खड्डे खोदले. मात्र आजतागायत ना दुरुस्ती पूर्ण झाली ना खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“या उघड्या खड्ड्यांमध्ये एखादा अपघात घडल्यास त्याला पूर्णतः पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनावेळी रामदास म्हस्के, प्रदीप जामनिक, सुदाम पाईकराव, फुलझाडे, गणपत भद्रे, सुधाकर इंगळे, अशोक भानुसे, शामसुंदर जाधव, इंद्रजीत हुड, सदाशिव मोरे, ऋषी निकस यांच्यासह परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे त्वरित बुजवावेत आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

महिलांचा संताप अनावर

दरम्यान, शनिवारी सत्यम नगर परिसरातील महिलांचा संताप अनावर झाला. महिलांनी रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. “टँकरने पाणी किती दिवस आणायचं? विकत पाणी कितीपर्यंत घ्यायचं? जर नागरिकांनी पैसे मोजूनच पाणी घ्यायचं असेल, तर महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभागाचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT