Vijayadashami festival celebrated with enthusiasm in Partura on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh
परतूर, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्य देशावर आलेल्या प्रत्येक संकटात आणि समस्येमध्ये समर्पण भावनेने धावून जाणारे स्वयंसेवक तयार करणे आहे, असे प्रतिपादन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते.
पुढे बोलताना प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, गेल्या १०० वर्षांत संघाला अनेक टीका सहन कराव्या लागल्या. मात्र, या राष्ट्राला परम वैभवाला नेण्याचे ध्येय समोर ठेवून डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार हे स्वतः स्वातंत्र्य संग्रामात आघाडीवर होते आणि कलकत्ता येथील क्रांतिकारी गटाचे सदस्य होते. स्वातंत्र्यानंतर हिंदूंची काय अवस्था होईल, या दूरगामी विचाराने त्यांनी संघाची स्थापना केली.
आज संघाच्या माध्यमातून अनेक सेवा प्रकल्प चालवले जातात आणि याच सेवाकार्याच्या आधारावर संघ शताब्दी वर्ष पूर्ण करत आहे. येणाऱ्या काळात स्वयंसेवकांनी विविध अभियान राबवून संघाला पुढे न्यायचे आहे आणि राष्ट्राला परम वैभवत्व प्राप्त करून देण्याची जबाबदारी स्वयंसेवकांची आहे, असे त्यांनी नमूद केले. स्वयंसेवकांनी स्वयंशिस्त बाळगावी. देशाच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवावेत. या शताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी राष्ट्राला सशक्त बनवण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख बक्ते प्रशांत कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोपीकिशन बांगड, परतूर तालुका संघचालक डॉ. प्रमोद आकात आदींची उपस्थिती होती.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संघाचा विजयादशमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला, ४०० गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनामुळे शहराचे वातावरण संघमय झाले होते. संचलन मार्गावर मातृशक्तीद्वारे रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. गोपीकिशन बांगड यांनी आरएसएसचा अर्थ राष्ट्र, सेवा आणि स्नेह असा सांगितला. राष्ट्राची सेवा करत जनतेचे स्नेह प्राप्त करून संघ शताब्दी साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रभक्तीसाठी स्वयंसेवकांनी प्रेरित होऊन आपले कार्य करावे असे डॉ. बांगड यांनी सांगितले.