Jalna Muncipal News : मनपाच्या कारभाऱ्यांनी स्वीकारला पदभार File Photo
जालना

Jalna News : मनपाच्या कारभाऱ्यांनी स्वीकारला पदभार

महापौरपदी वंदना मगरे व उपमहापौरपदी राजेश राऊत बिनविरोध; विशेष सभेत फेटे बांधून आले सदस्य

पुढारी वृत्तसेवा

Vandana Magare elected as Mayor and Rajesh Raut as Deputy Mayor unopposed

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात सोमवार दि.९ हा दिवस सुवर्णाश्वरांनी नोंदविला गेला. शहराच्या पहिल्या महापौर व उपमहापौरांची बिरविरोध निवड झाली. महपौरपदी वंदना अरुण मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सव्वा सव्वा वर्ष या पदाचा कारभार राहणार आहे.

दरम्यान, निवडीसाठी सोमवार दि. ९ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीत श्रीमती वंदना अरुण मगरे यांची जालना शहराच्या प्रथम महापौर म्हणून, तर राजेश रामभाऊ राऊत यांची प्रथम उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

जालना शहर महानगरपालिका महानगरपालिकेच्या नूतन सभागृहात सकाळी ११ वाजता पिठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरुवात झाली. सभेच्या प्रारंभी भारतीय जनता पक्षाचे सदस्य, त्यानंतर अपक्ष व शिवसेना सदस्यांचे सभागृहात आगमन झाले. 'वंदे मातरम्'ने सभेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

महापौर पदासाठी ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत श्रीमती वंदना अरुण मगरे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जास सूचक महेश निकम व अनुमोदक रमेश गौरक्षक होते. पीठासन अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करून तो वैध असल्याचे जाहीर केले. अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या मुदतीनंतर सकाळी १०:३७वाजता श्रीमती मगरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

महापौर निवडीनंतर उपमहापौर पदाची प्रक्रिया पार पडली. या पदासाठीही राजेश रामभाऊ राऊत यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जास सूचकशशिकांत रामकृष्ण घुगे व अनुमोदक भास्कर दानवे होते. कायदेशीर तरतुदीनुसार १५ मिनिटांची मुदत देण्यात आल्यानंतर सकाळी ११:५२ वाजता राजेश राऊत यांची जालना शहराचे प्रथम उपमहापौर म्हणून घोषणा करण्यात आली. राष्ट्रगीताने या ऐतिहासिक विशेष सभेची सांगता झाली.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या या निवडप्रक्रियेपूर्वी सर्व सदस्यांचे फेटे बांधून महापालिकेत आगमन झाले.

चार वर्षांनंतर प्रशासक राज संपुष्टात

तब्बल चार वर्षांनंतर जालना शहर महानगरपालिकेतील प्रशासक राज संपुष्टात आले आहे. या कालावधीत महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय पातळीवरून चालविण्यात येत होता. आता लोकनियुक्त महापौर व उपमहापौरांची निवड झाल्याने नियमित लोकशाही प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित झाली आहे. यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर थेट निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी उपलब्ध झाल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनिर्वाचित सदस्यांना यशदा येथे प्रशिक्षण

महानगरपालिकेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसाठी 'यशदा, पुणे' येथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी व सुलभ होईल, असे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT