परतूर ः तालुक्यातील उस्मानपूर आरोग्य उप केंद्राची नवीन इमारत.  (छायाः भारत सवने)
जालना

Jalna News : उस्मानपूर आरोग्य उपकेंद्राला अखेर हिरवा कंदील

गावकऱ्यांच्या तब्बल आठ वर्षांच्या संघर्षाला यश

पुढारी वृत्तसेवा

परतूर ः परतूर तालुक्यातील उस्मानपूर येथील आरोग्य उपकेंद्र अखेर 9 जून 2026 पासून सुरू झाले असून, गावकऱ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नामुळे गावकऱ्यांना आरोग्य सुविधांसाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. आता गावातच आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उस्मानपूर येथील जुनी आरोग्य उपकेंद्र इमारत मोडकळीस आलेली होती. त्यामुळे नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने सादर केली. या प्रयत्नांना यश मिळत जिल्हा नियोजन समितीमार्फत 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र विविध कारणांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. 2022 मध्ये बांधकामाचा कालावधी संपल्याने निधी परत गेला.

त्यानंतरही गावातील तरुणांनी हार न मानता जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने देत पाठपुरावा सुरू ठेवला. विशेषतः एप्रिल व मे 2026 मध्ये विविध स्तरांवर निवेदने, ई-मेल आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे मागणी लावून धरली.

गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबत आदेश जारी केले. त्यानुसार 9 जून 2026 पासून उस्मानपूर आरोग्य उपकेंद्रात नियमित आरोग्य सेवा सुरू करण्यात आली.या यशाबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य उपकेंद्र सुरू होण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आज दवाखाना प्रत्यक्षात सुरू झाला, याचा आम्हाला आनंद आहे.
गोविंद राऊत, उस्मानपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT