Upcoming elections, administration alert
जालना, पुढारी वृत्तसेवा : आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत बैठक संपन्न झाली.
त्यावेळी श्रीमती मित्तल या बोलत होत्या. यावेळी बैठकीस पोलिस अधीक्षक अजयकुमार बसंल, प्रभारी अपर उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, येणाऱ्या कालावधीत स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात शांततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी पूर्व नियोजन करावे.
तसेच सदर कालावधीत जिल्ह्यात व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात यावा. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन व संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांवर उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात कुठेही कोणताही अनुचित प्रकार किंवा गुन्हेगारी घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. उपविभागीय दंडाधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी समन्वय साधून प्रकरण दाखल झाल्यापासन एका महिन्यात निकाली काढावेत. तत्काळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
स्थानबद्धतेकरिता प्रस्ताव सादर करावे
हद्दपार व्यक्ती आदेशाचे पालन करत असल्याचे पोलिसांनी तपासणी करावी. प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रकरणे निकाली काढावीत. गुन्हेगाराविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याकरिता पोलिस विभागाने आवश्यक तपासणी करून कायद्यांतर्गत स्थानबद्धतेकरिता प्रस्ताव सादर करावेत.