सुखापुरी ः अंबड तालुक्यातील रुई गावात महिनाभरात दोन खून झाल्याच्या घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांकडेही चाकू, कोयते यांसारखी तीक्ष्ण हत्यारे आढळत आहे. यामुळे गावात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील लोकप्रतिनिधी व पोलिस प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
गावातील चौक, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी टोळक्यांची वाढती वर्दळ, रात्री उशिरापर्यंतची भटकंती आणि शस्त्रांची उघड मिरवणूक यामुळे सर्वसामान्य नागरिक दडपणाखाली जगत आहेत. “वाद झाला की थेट हत्यार काढले जाते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
युवकांमध्ये वाढती भाईगिरी आणि त्याला मिळणारी मूक साथ यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची खंत वयोवृद्ध व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रतिबंधात्मक गस्त, संशयित टोळक्यांवर लक्ष, शस्त्रबंदीची काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर समुपदेशन यांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. “घटना घडल्यानंतर हालचाल दिसते; पण आधीच रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत,” अशी नाराजी व्यक्त होते.
दरम्यान, ग्रामपंचायत, शाळा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. शाळा-महाविद्यालयांत जनजागृती व समुपदेशन, पालक-पोलीस-ग्रामस्थ संयुक्त बैठक, सीसीटीव्ही बसविणे, रात्रीची संयुक्त गस्त, आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईया उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.
दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त
सलग दोन खुनांनी दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेच; पण रुईकरांच्या मनातील सुरक्षिततेची भावना हादरवली आहे. गाव पुन्हा शांततेकडे वळण्यासाठी प्रशासन, पोलिस आणि नागरिक यांनी समन्वयाने, सातत्यपूर्ण आणि दृश्यमान कृती करणे ही काळाची गरज ठरत आहे.