Jalna News : मंदिरातील दानपेटी फोडणारे दोन अल्पवयीन चोरटे दोषी Pudhari File Photo
जालना

Jalna News : मंदिरातील दानपेटी फोडणारे दोन अल्पवयीन चोरटे दोषी

परतूर शहरातील ओंकारेश्वर मंदिरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Two minor thieves convicted for breaking into temple donation box

परतूर, पुढारी वृत्तसेवा : परतूर शहरातील संभाजीनगर कॉलनीत ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेतील अल्पवयीन चोरांना चोरीच्या गुन्ह्यात जालना येथील बाल न्याय मंडळाने दोषी ठरवले आहे. त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि वडिलांच्या हमीपत्रावर एका वर्षासाठी चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परतूर पोलिस ठाण्यात दाखल भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) सह ३ (५) अंतर्गत विधी संघर्ष बालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अशोक गाढवे यांनी करून बाल न्याय मंडळासमोर दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी जालना येथील प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ यांच्या न्यायालयात पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांनी १ जुलै २०२६ रोजी दोन्ही विधी संघर्ष बालकांना चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. तथापि, बालकांचे वय आणि त्यांचे भविष्य विचारात घेऊन, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम १८ (१) (इ) अंतर्गत न्यायालयाने त्यांना चांगल्या वर्तणुकीच्या परिविक्षेवर सोडण्याचा निर्णय घेतला.

या आदेशानुसार, दोन्ही बालकांना सक्त ताकीद देण्यात आली असून, आगामी एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी आपले वर्तन चांगले ठेवावे, यासाठी त्यांच्या वडिलांकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बंधपत्र लिहून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशोक गाढवे यांनी केला तपास

या संवेदनशील खटल्यात जालना पोलिस मुख्यालयाचे कोर्ट पैरवी पोलिस अंमलदार फेरोज इकबाल खान यांनी यशस्वी पैरवी केली, तर तपासिक अंमलदार म्हणून परतूर पोलिस ठाण्याचे अंमलदार अशोक गाढवे यांनी चोख भूमिका बजावली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT