Jalna Accident : ट्रक-कार अपघातात दोन जण जागीच ठार file photo
जालना

Jalna Accident : ट्रक-कार अपघातात दोन जण जागीच ठार

देवदर्शनाला जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला, अंबड येथील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर शनिवारी रात्री झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

Two killed on the spot in truck-car collision

अंबड, पुढारी वृत्तसेवा : मढी येथील कानिफनाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या तीन मित्रांच्या कारला जालना-अंबड रोडवरील अंबड येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. ट्रक आणि वॅगनार कार यांच्यात झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार (२७) रोजी रात्री ११ ते ११:३० च्या सुमारास घडला असून, दोन्ही वाहनांची समोर समोर धडक झाल्याषने वॅगनार कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील रहिवासी संजय दामोदर शिंदे या मामाची वॅगनार कार घेउन त्यांचा भाचा विकास दगडूबा चव्हाण (वय २६) (रा. कुंभाझरी तालुका जाफराबाद) याने मढीला देवदर्शनासाठी जायचे असे सांगून शनिवार (२७) जून रोजी दुपारी ५.०० वाजता मामाकडुन कार घेतली होती.

विकास चव्हाण सोबत त्याचे मित्र सागर दीपक बरडे (वय २० वर्ष) (रा. कुमाझरी तालुका जाफराबाद) आणि शुभम गणेश बहुले रा. टेंभुर्णी हे तीघेही कारने मढी येथे जाण्यासाठी निघाले असता अंबड-जालना रोडवरील अंबड येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्यांच्या गाडीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. यात विकास दगडोबा चव्हाण व सागर दीपक बरडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर शुभम गणेश बहुले हा गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान शुभम बहुले हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय अंबड येथील डॉ. स्वप्निल पाटील यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यालला जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

कुटुंबाचे कुलदीपक विझले; कर्ते पुरुष हरपले

या अपघातामुळे कुंभाझरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत हृदयद्रावक आहे. विकास चव्हाण (वय २६) याच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. घरात तो एकुलता एक कमवता मुलगा होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई आणि एक बहीण असा परिवार आहे. आईच्या नावावर अवधी दोन एकर शेती असून विकासच घराचा मुख्य आधार होता तर सागर बरडे (वय २०) याच्या डोक्यावरूनही वडिलांचे छत्र हरपलेले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तो मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ आहे.

पोलिसांची तत्परता आणि ग्रामस्थांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राम मते, संदीप कुटे, मंडलिक, भरत कचरे, विजय केंद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना कास्बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

नातेवाईकांना माहिती मिळताच रात्रीच कुंभाझरीचे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन डॉ. स्वप्नील पाटील यांनी केले. या भीषण अपघातामुळे अंबड आणि कुंभाझरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT