Trader dumps tomatoes on the road due to a crash in prices
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याचने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे अखेर वैतागलेल्या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना फुकट टोमॅटो वाटून टाकले. त्यानंतर उरलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून देत व्यापाऱ्यांनी बाजारातून काढता पाय घेतला.
भोकरदनच्या शनिवारच्या आठवडी बाजारात आसपासच्या भागातून शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाटे विक्रीसाठी आणले होते. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक प्रचंड झाल्याने टमाट्याचे भाव कोसळल्या गेले. सुरुवातीला पाच रुपये किलो या कवडीमोलाने टमाटे विकण्याचा प्रयत्न झाला.
मात्र खरेदीदारांचा प्रतिसाद कमी असल्याने आणि विक्री न झालेला माल पुन्हा वाहतूक करून माघारी नेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने व्यापाऱ्यांनी नागरिकांना मोफत टमाटे घेऊन जाण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचे दिसुन आले.
भावामुळे निराशा
मोफत वाटुनही विक्रेत्यांकडे टमाटे शिल्लक राहिल्याने त्यांनी उरलेला माल वाहतुक खर्च परवडत नसल्याने बाजारातच टाकून दिला. टमाट्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली असून टमाटे उत्पादक शेतकरी व विक्रेत्या व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.