There is no setback to OBC reservation: Radhakrishna Vikhe Patil
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (दि.९) अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. ही व्यक्तिगत भेट असून, त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
२ सप्टेंबरच्या जीआरबाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे, असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या, असे आवाहनही विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे. हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भामध्ये प्रकरण न्यायालयात असताना मोर्चे काढणे योग्य नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
... तर हा प्रश्नच उद्भवला नसता
१९९४ ला शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्नच उद्भवला नसता, असेही विखे पाटील म्हणाले. दरम्यान, आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मी विखे पाटलांना स्पष्टपणाने सांगितले आहे, मला जीआरनुसार प्रमाणपत्र पाहिजे. एक-दोन तास मी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. विखे साहेबांमध्ये आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसतो आहे. तो माणूस १००% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी आपण सरकारविरोधात जाणार. तुम्ही आरक्षण दिले तर आम्हाला काय घेणे पडले राजकारणाचे, जो देईल तो आमचाच, असे जरांगे म्हणाले.