The wondrous world of geography in the company of the Eleven Marutis
जालना, पुढारी वृत्तसेवाः 'जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।' या समर्थ रामदास स्वार्मीच्या विचारांना कृतीची जोड देत प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी गेल्या २३ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात निःस्वार्थपणे विविध उपक्रम राबवत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी 'समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती' हा भव्य पर्यावरणपूरक देखावा आणि त्यासोबत भूगोलाचे अद्भुत प्रदर्शन साकारले आहे.
अकराही मारुतींच्या मूर्ती जशा आहे तशाच तयार करण्यात आल्या आहेत. हनुमान हे शक्त्ती, बुद्धी व भक्तीचे प्रतीक असून प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष क्षमता असते. श्रद्धा, प्रयत्न व चिकाटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्त्ती जागृत व्हावी, हा या देखाव्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रा. चिंचखेडकर यांनी सांगितले.
हनुमानाच्या अणुरेणू पासून ब्रह्मांडापर्यंतच्या व्यापक स्वरूपाची संकल्पना आणि निसर्गाशी असलेले त्यांचे जवळचे नाते यांची सांगड घालत भूगोल विषयाचे हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. पृथ्वी, भारतभूमी, सूर्यमाला, अवकाश व विश्व यांसह भूगोलातील साधारण १४० विविध संकल्पना व ८० ते ९० प्रत्यक्ष मॉडेल्स आणि प्रात्यक्षिके मांडण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना अवकाशाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी टेलिस्कोपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रदर्शनातून निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही प्रा. चिंचखेडकर यांनी विज्ञान प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, भारतातील प्रसिद्ध स्थळे आदी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम साकारले आहेत.
हे अकरा मारुतींचे दर्शन व भूगोल प्रदर्शन विजयादशमी अर्थात दसऱ्या-पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी भेट देऊन या ज्ञानवर्धक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी केले आहे.