The second water week in the state will be held in the soil of 'Kamangaon'
विठ्ठल फुलारी भोकरः पाणी टंचाईला काही प्रमाणात आळा बसावा, गाव शिवारात पडणारे पाणी गाव शिवारातच मुरावे हा हेतू डोळ्यासमोर सेवा समर्पण परिवार व कामनगाव च्या ग्रामस्थांनी राज्यातील दुसरा पाणी सप्ताह साजरा करणार आहेत. या पाणी सप्ताहाचे उद्घाटन दि.१५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून या सप्ताहात पाण्यासाठी जागर घालण्यात येणार आहे.
शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मागील अनेक वर्षापासून रासायनिक खतांचा वापर बेसुमार करण्यात आला. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. अति रासायनिक खतांचा वापर झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाले आहेत. यामुळे जमीन टणक झाली आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी झाली. यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तरी हे पाणी मोठ्या प्रमाणात जमीनीत मुरत नाही. भोकर तालुक्याची पावसाची सर्वसाधारण सरासरी ९६३ मिमी पाऊस आहे. हे वर्ष वगळता मागील तीन वर्षात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होवून सुद्धा पाणी निर्माण झाली. सध्या पाणी वापरात कितीतरी पटीने वाढ झाली आहे.
पाण्याचा वापर प्रचंड वाढलेला आहे. यामुळे भूजल पातळी दरवर्षी खालावत आहे. यावर्षी तर १२ फूट पाणी पातळीत घट झाली. यामुळे उन्हाळ्यात जमिनीच्या अंतर्गत खोलवर असलेले क्षारयुक्त पाणी वापरावे लागते. यावर एकच उपाय म्हणजे जलसंधारण ची कामे हाती घ्यावी लागणार आहे. जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पावसाचा थेंब न थेंब अडविणे व जिरवणे आवश्यक आहे.
पावसाचे शुद्ध पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे व पाण्याची गुणवत्ता वाढणे हे काम प्रत्येक गावात, प्रत्येकाने प्राधान्याने करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण धार्मिक प्रयोजनातून गावामध्ये सप्ताह साजरे करतो त्याच पद्धतीने गावच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी आडविणे व जिरवीणे यासाठी देखील आपले तन-मन-धन अर्पण करून प्रत्येक गावात पाणी सप्ताह कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
हे लक्षात घेऊन सेवा समर्पण परिवार ने मागील वर्षी पासून पाणी सप्ताह साजरा करत आहेत. राज्यातील दूसरा पाणी सप्ताह कामनगाव येथे दि. १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यासाठी कामनगावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
असा होईल पाणी सप्ताह साजरा....
सकाळी ७ ते १० श्रमदान व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे. दुपारी १२ वाजता पाणी, वृक्षारोपण, स्वच्छता यावर व्याख्यान, ३ ते ६ पुन्हा श्रमदान, रात्री ७:३० वाजता किर्तन. यामध्ये वृक्षमित्र अण्णासाहेब जगताप, साहित्यिक तथा साखर आयुक्त श्रीकांत देशमुख, कथाकार राम तरटे, साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे, जलतारा प्रकल्पाचे जनक पुरूषोत्तम वायाळ. महाराष्ट्र राज्याचे बॅण्ड अॅम्बेसेडर, स्वच्छता दुत प. पु. राष्ट्रसंत सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचे व्याख्यान होणार आहे तर हभप डॉ लक्ष्मीकांत रहाते, हभप शिवाजी महाराज पावडेवाडीकर, हभप मारोती महाराज नांदेकर, हभप शिवाजी महाराज पिंपळगावकर, हभप डॉ दिगंबर शिंदे महाराज गडगेकर, हभप गजानन महाराज गायकवाड, हभप दशरथ महाराज अंबोरे बारडकर यांचे किर्तन होणार आहेत.
कामनगाव येथे होणाऱ्या पाणी सप्ताहास माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. रविंद्र चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार विनोद गुंडमवार, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, बाजार समिती चे सभापती जगदीश पाटील, उमरी बाजार समिती चे सभापती शिरिष देशमुख, नगराध्यक्ष भगवान दंडवे, यासह तालुक्यातील सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.