The potato harvesting is in full swing
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. सध्या बटाटा काढणीची लगबग सुरू असून बटाटा पिकातून चांगले उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारात परिसरातील दहा ते बारा गावांतील ग्रामस्थ भाजीपाल्यासह इतर वस्तु खरेदीसाठी येतात. पिंपळगाव रेणुकाई परिसरात मिरचीची लागवडही मोठ्या प्रमाणात होत असताना येथील मिरची संपूर्ण महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर पाठवली जात असल्याने पिंपळगाव रेणुकाई येथे मिरचीचे मोठी बाजारपेठ आहे.
यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने फळभाज्यासह इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात लागवड करतात. पिंपळगाव परिसरात वीस ते पंचवीस हेक्टरवर बटाटे लागवड करण्यात आली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील मंगळावरच्या आठवडे बाजारात बटाट्यांना वीस ते पंचवीस रुपये किलोचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
मेथी व कोथिंबीर लागवड करणाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे बटाटा उत्पादकांमधे दिलासादायक चित्र दिसत आहे.
एक एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे. सध्या बटाटा काढणीच्या अवस्थेत आहे. मेथी व कोथिंबीर या दोन भाज्यांना भाव मिळत नसताना बटाट्यांना चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांत सध्या तरी समाधान व्यक्त होत आहे.-संदीप रावसाहेब देशमुख, बटाटा उत्पादक शेतकरी