The new year was welcomed with great celebration in the district.
जालना,पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहराच्या विविध हॉटेलमध्ये रंगणाऱ्या पार्ट्यांसाठी विविध पॅकेजेस जाहीर करण्यात आले होते. सोशल मीडियावरही न्यू इयर्स इव्ह इफेक्ट दिसून आला.
31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी आहे. कुठे कौटुंबिक स्नेहमिलन, तर कुठे साग्रसंगीत पार्ट्या होताना दिसून आल्या. शहरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी बाजारपेठाही सज्ज झाली होती. विशेषत: शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या.डान्स आणि म्युझिक शोदेखील आयोजित करण्यात आले होते. काही हॉटेल चालकांचे सेलिब्रेटींना बोलविण्याचे प्रयत्न कल्याचे सांगण्यात आले. काही हॉटेल्समध्ये तर विशेष मेन्यूचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील मोठ्या हॉटेल्सप्रमाणेच अन्य छोट्या पार्सल पॉइंटवरही मागणी जोरात होती.
आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना खास सवलत देण्यात आली.नव्या वर्षाच्या स्वागताचा बाजारपेठेवरही प्रभाव जाणवला. फ्लॅटपासून गृहोपयोगी वस्तू मोबाइल या साऱ्यांवरच मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या.ऑनलाइन शॉपिंगमध्येही अशाच प्रकारे ऑफर्स दिल्या जात होत्या. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
यंदा महापालीका निवडणुकीमुळे थर्टी फर्स्टचा उत्साह ओसंडुन वाहतांना दिसून आला. उमेदवार व त्यांच्या समर्थकांसह प्रभागातील मतदारही काही ठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करताना दिसून आले. प्रशासनाकडूनही नव्या वर्षाची जय्यत तयारी करण्यात आली होती.पोलिस प्रशासनाकडुन सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते.डिलीव्हरी बॉईजच्या संपामुळे घरी बसून विविध पदार्थ ऑर्डर करणाऱ्यांची संपामुळे अडचण झाल्याचे दिसून आले.
वाहनचालकाची तपासणी
जालना शहरात शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी फिक्स पॉइंट नेमण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत चौका-चौकात संशयित वाहनचालकांची ब्रेथ ॲनलायझरव्दारे तपासणी करण्यात येत होती.
जालना शहर वाहतूक शाखेने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी संशयित वाहनचालकांची तपासणी केली.त्यासाठी पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह 25 पोलिस कर्मचारी शहरातील विविध स्पॉटवर कर्तव्यावर होते.-प्रताप इंगळे, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा