School News : शिक्षकांचे शाळेत उशिरा येण्याचे प्रमाण वाढले... file photo
जालना

School News : शिक्षकांचे शाळेत उशिरा येण्याचे प्रमाण वाढले...

अंबड तालुक्यातील झेडपी शाळेतील चित्र, कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

The incidence of teachers arriving late to school has increased...

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेत पोहोचत नसल्याने तक्रारी पालक व ग्रामस्थांकडून होत आहेत. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून शिक्षक अपडाऊन करत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षक वेळेवर शाळेत न पोहोचल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने पालक दिवसभर शेतात व्यस्त असतात. त्यामुळे शाळेतील उपस्थिती व दैनंदिन कामकाजावर त्यांचे लक्ष राहात नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही शिक्षक वेळेचे पालन करत नसल्याची चर्चा गावागावांत रंगली आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक तास महत्त्वाचा असतो. मात्र शिक्षकच वेळेवर शाळेत पोहोचत नसतील, तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणार कोण, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. शासन शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना काहींच्या निष्काळजीपणामुळे या प्रयत्नांवर पाणी फिरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यांचा परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीवर होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अंबडचे गटशिक्षण अधिकारी यांनी अचानक तपासण्या करून वस्तुस्थिती पडताळावी, वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना वेळेवर शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील. वेळेचे पालन न करणाऱ्या शिक्षकांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेवर वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- रवी कावडे, गटशिक्षणाधिकारी, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT