The days of standing in line for fertilizer are coming to an end!
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : रासायनिक खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर लागणाऱ्या रांगा, गर्दी आणि प्रतीक्षेचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (एफएफएस) या डिजिटल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून अनुदानित खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असून, बुकिंगनंतर मिळणारा क्यूआर कोड दाखवून संबंधित विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनेकदा कृषी सेवा केंद्रांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. गर्दीमुळे वेळ आणि श्रम खर्ची पडतात. ऐन हंगामात खतांची गरज असताना होणारी ही धावपळ कमी करण्यासाठी एफएफएस डिजिटल प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. मोबाईलवरूनच खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असल्याने शेतकऱ्यांना खत खरेदीचे नियोजन करणे सोयीचे होईल. तसेच पारदर्शकत येणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत एफएफएस अॅप डाउनलोड करून आवश्यक नोंदणी करावी. त्यानंतर फार्मर आयडी, जमिनीची आणि पिकांची माहिती भरावी पिकांच्या गरजेनुसार आवश्यक खताचा प्रकार व प्रमाण निवडून जवळच्या अधिकृत खत विक्रेत्याकडे बुकिंग करता येईल. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक उपलब्ध होईल. हा कोड संबंधित खत विक्रेत्याला दाखवून खत खरेदी करता येणार आहे.
दरम्यान, एफएफएस अॅप डाउनलोड करणे, फार्मर आयडी तयार करणे, जमिनीची व पिकांची माहिती भरणे किंवा ऑनलाइन बुकिंग करताना तांत्रिक अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या डिजिटल प्रणालीची माहिती घेऊन आवश्यक खतांची आगाऊ बुकिंग करावी, असे आवाहन प्रवीण गाडेकर, कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, घनसावंगी यांनी केले आहे.
पारदर्शकता वाढण्यास मदत
बुकिंग केल्यानंतर खत खरेदीसाठी निश्चित केलेली मुदत पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुकिंग करताना अॅपवर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. या प्रणालीमुळे खत खरेदीची नोंद ऑनलाइन पद्धतीने होणार असून, खत वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. तसेच उपलब्ध खतसाठ्याचा विचार करून आवश्यक खत खरेदीचे नियोजन करता येणार आहे.