The crop is lost; it is now time to harvest it for animal fodder
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: पावसाने ऐन पीक भरण्याच्या काळात पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेच भरले नसल्याने उत्पादनाची आशा जवळपास मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली असली तरी त्यामागे सोयाबीनची अपेक्षा नसून, जनावरांसाठी भुसा तरी मिळावा, एवढीच आशा उरली आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने काहीसा दिलासा दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. मात्र, पिकाची वाढ सुरू असतानाच पावसाने मोठा खंड घेतला. त्यानंतर पावसाची प्रतीक्षा करत असतानाच जमिनीतील ओलावा संपला. सोयाबीनची वाढ खुंटली, झाडे सुकली आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पिकाला पाण्याचा मोठा ताण बसला. परिणामी अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या शेंगा दिसत असल्या तरी त्यात दाणा नसल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत केलेला खर्चही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बियाणे, मशागत, पेरणी, खत, फवारणी यावर खर्च केल्यानंतर आता काढणीसाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, काढणीनंतर हातात येणारे उत्पादन अत्यल्प असल्याने खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे.
सोयाबीन जनावरांसाठी भुसा मिळावा म्हणून शेतकरी काढत आहेत. दाण्याचे उत्पन्न मिळेल, अशी आता कोणतीही आशा उरलेली नाही. पावसाअभावी पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. निदान भुसा तरी जनावरांच्या उपयोगी पडेल म्हणून शेतकरी सोयाबीनची काढणी करीत आहोत. दुष्काळी परिस्थितीचा फटका सोयाबीनसह खरीप हंगामातील विविध पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
एकीकडे पिकातून उत्पन्न मिळत नसताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
यंदा सोयाबीनच्या दाण्याऐवजी भुसाच शेतकऱ्यांच्या पदरी पडणार असल्याने खरीप हंगामाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरलेले सोयाबीन आता केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी काढण्याची वेळ आली असून, पावसाअभावी शेतकऱ्यांची ही अवस्था प्रशासन आणि शासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
पिकाची अवस्था पाहता सोयाबीनमधून दाणे हाताला लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. पावसाने साथ दिली असती तर उत्पादनाची अपेक्षा होती; मात्र ऐन शेंगा भरण्याच्या काळात पाऊस गायब झाला. आता केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी सोयाबीन काढण्याची वेळ आली आहे. शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन मदत करावी.सतीश घोगरे, म. चिंचोली शेतकरी