The complainant's Rs 95 lakh was returned.
जालना, पुढारी वृत्तसेवा : इंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या दीड वर्षात सायबर पोलिसांकडे सुमारे २ हजार २२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात तक्रारदारांना सुमारे १३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघड झाले आहे. यापैकी ९५ लाख रुपये मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, इंटरनेटमुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याच तुलनेत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सायबर पोलिसांकडून चौकशीअंती ३ कोटी ४७ लाख रुपये फ्रीज करण्यात आले आहेत.
यूपीआयच्या माध्यमातून सध्या प्रत्येकजण आर्थिक व्यवहार करत आहे. चहा पिण्यापासून तर मोठमोठ्या वस्तू खरेदीपर्यंत ऑनलाईन व्यवहार करत आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सायबर चोरट्यांनीही सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू केले आहेत.
अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या लिंक ओपन करणे, बँक खात्याची माहिती देणे, शेअर मार्केट, आदी विविध प्रकारांतून ही फसवणूक असल्याचे दिसून येत आहे. साबर पोलिसांच्या १९३० या टोल फ्री क्रमांकावर गत दीड वर्षात तब्बल २१९९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर सायबर पोलिसात गतवर्षी १५ आणि चालू वर्षात सात गुन्हे दाखल झाले आहेत.
बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या लिंक ओपन करू नयेत. सायबर पोलिस ठाण्यात किंवा ऑनलाइन तक्रार येताच आम्ही बँकांशी संपर्क करून रक्कम फ्रीज करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून तक्रारदारांना पैसे परत मिळवून दिले जातात.-पोनि. गुणाजी शिंदे