टेंभुर्णी : टेंभुर्णी-पापळा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या कामासाठी आमदार संतोष दानवे यांच्या विकास निधीतून साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. ग्रामस्थाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा केल्याने रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते पापळ या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले होते. लघुपाटबंधारे विभाग शाखा टेंभुर्णी यांनी पाटाच्या चारीवरील एक किलोमीटरच्या रस्त्यावर अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम थांबले होते.
या विरोधात पापळ आणि टेंभुर्णी गावकऱ्यांनी एकजूट केली. गावकऱ्यांनी तक्रार देऊन आम्ही जन आंदोलन करू आणि धरणे धरू असा इशारा जालना कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे यांना दिला होता. आमदार संतोष दानवे, माजी जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के, उद्धव दुनगहू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यानंतर ज्ञानेश्वर माऊली पवार, सरपंच नामदेव कुहीरे, नारायण जाधव, सुभाष गायकवाड, अर्जुन बोबडे, बाजीराव बोबडे, आनंता जाधव, श्रीकृष्ण जाधव, रावसाहेब मोरे, ज्ञानेश्वर इंगळे, ज्ञानेश्वर बोंबले, उपसरपंच अनिल ससाणे, दिलीप मोरे, गजानन ससाणे, दिनकर सरोदे, पंडित जाधव, दादासाहेब जाधव, दिनेश खडसे, गणेश कुहीरे, सय्यद मुनाफ, दामोदर इंगळे यांनी आमदार संतोष दानवे यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
या मागणीची दखल घेऊन आमदार संतोष दानवे यांनी संबंधित गुत्तेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आणि कामाचा अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यामुळे अखेर टेंभुर्णी ते पापळ रोडच्या रखडलेल्या एक किलोमीटरच्या भागाचे काम सुरू झाले आहे. यामुळे पापळ आणि टेंभुर्णी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
टेंभुर्णी ते पापळ रोडवरील कामास लघुपाटबंधारे विभागाने अडथळा निर्माण केला होता. यासंबंधी आ. संतोष दानवे याच्या कडे तक्रार नोंदवली. आ. दानवे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.ज्ञानेश्वर पवार, ग्रामस्थ