परतूर : परतूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा येथील अवैध दारूसाठा जप्त करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबड येथील पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. परतूर आणि मंठा हे दोन तालुके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबड येथील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. गुळखंड तांडा येथील नवनाथ भाऊसाहेब राठोड याने आपल्या किराणा दुकानात अवैधरित्या बनावट देशी आणि विदेशी दारूचा साठा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवला असल्याची माहिती पथकाला गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. या बाबत कारवाई करण्यासाठी दुपारी १ वाजता गुळखंड तांडा येथे गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबड येथील दुय्यम निरीक्षक सुमित फावडे यांच्या पथकावर दगड, लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला.
पथकातील महिला कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला करण्यात आला. पंधरा ते वीस जणांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यामुळे जखमी अवस्थेतील पथकातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्याची तेथून पळ काढला. घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास सदरील अवैधसाठा जप्त करण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा घेऊन गेले असता, संजय नामदेव राठोड व संजय धोंडीराम चव्हाण यांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुम्ही परत गावात कसे आलात म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी सुमित फावडे यांच्या फिर्यादीवरून पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नामदेव सीताराम राठोड,भाऊसाहेब रावसाहेब राठोड, संजय नामदेव राठोड, संजय धोंडीराम चव्हाण, याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल रावते हे करीत आहेत.