Farmers Protest in Jamkhed File Photo
जालना

Jalna News: जमीन दिली, आता रोजगार मिळेना; टाटा सोलार प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

अंबड तालुक्यातील जामखेड येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News

जामखेड : विलास बा. जाधव

अंबड तालुक्यातील जामखेड येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी २३ ऑक्टोबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी (ता. २४) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. जमीन देणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील पात्र तरुणांना प्रकल्पात थेट कामावर घ्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

जामखेड परिसरातील टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीच्या सौरऊर्जा प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याऐवजी त्यांना संधी मिळत नसल्याची आंदोलकांची तक्रार आहे. विशेषतः स्थानिक तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून थेट कामावर घेऊन त्यांना नियमित ड्युटी द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जमीन देणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रोजगार मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार

स्थानिक तरुणांना प्रत्यक्ष कामावर घेण्याची मागणी मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित कंपनी आणि प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या आमरण उपोषणात प्रकाश पांढरे, हरिश्चंद्र दिवटे, हरिश्चंद्र तार्डे आणि श्रीमंत पांढरे सहभागी आहेत. भगवान भोजने, शिवराम भोजने, शाम वैद्य, कृष्णा भोजने, शुभम पांढरे, कैलास खंडागळे आदी सहभागी आहेत.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे संबंधित कंपनीने गांभीर्याने पाहिले पाहिजे. पात्र स्थानिक तरुणांना प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून थेट कामावर घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी कंपनीने ठोस निर्णय घ्यावा.
पंकज मंडलिक, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद मराठवाडा उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT