Jalna Crime pudhari photo
जालना

Jalna Crime : दहा तलाव परिसरात शासकीय पथकाला मारहाण

बारा जणांविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात तक्रार, पाच जणांची नांवे समोर

पुढारी वृत्तसेवा

तळणी : मंठा तालुक्यातील माळेगाव शिवारातील दहा लघु तलाव परिसरात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांची नावे समोर आली असून, अन्य सात जणांचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या फिर्यादीनुसार पाटबंधारे विभागातील जालना येथील शासकीय मोजणीदार नीरज दत्ता गायकवाड (वय ३३), हे अनधिकृत पाणी उपसा प्रतिबंधक पथकात कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी दहा लघु तलाव परिसरातील विहिरीवरील मोटारीचे वीज कनेक्शन डीपीवरून बंद केले होते.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नीरज गायकवाड व महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रल्हाद जाधव हे पाहणीसाठी गेले असता, बंद केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कनेक्शन पुन्हा बंद करण्याची कार्यवाही सुरू असताना तेथे १० ते १५ जण जमा झाले. विहिरी खोदण्यासाठी मोठा खर्च केल्याचे सांगत त्यांनी कनेक्शन तोडण्यास विरोध केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेत तुकाराम जयराम राठोड यांनी मध्यस्थी करून दोन्ही कर्मचाऱ्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आदेशानुसार कायदेशीर कर्तव्य बजावत असताना अडथळा आणून मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी

यावेळी जमलेल्या लोकांनी प्रल्हाद जाधव यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाधव यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या नीरज गायकवाड यांनाही चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, पुन्हा या ठिकाणी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT