सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई गावातील एका शेतात उन्हाळी बाजरीचे पीक बहरले. pudhari photo
जालना

Summer bajra cultivation : रखरखत्या उन्हात डोलते 'उन्हाळी बाजरी'चे सोने

अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील चित्र

पुढारी वृत्तसेवा

सुखापुरी : परिसरात यंदा उन्हाळी बाजरीचे पीक जोमात बहरले असून शेतामध्ये हिरव्यागार कणसांची डोलणारी लय पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस पावसाळी बाजरीच्या पेरात घट होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता उन्हाळी बाजरीकडे पर्याय म्हणून वळण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यातील मजूर टंचाई, तसेच काढणीच्या काळात होणारा अवेळी पाऊस यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. कापणीच्या वेळी पावसामुळे दाण्यांची गुणवत्ता घसरत होती आणि आर्थिक तोटाही सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापनासह उन्हाळी हंगामात बाजरीची लागवड सुरू केली.

विहिरीना मुबलक पाणी असल्याने फायदा होत आहे. उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता जरी अधिक असली तरी ठिबक व विहिरीच्या पाण्याच्या साहाय्याने पीक उत्तम जोम धरत आहे. सध्या शेतात भरगच्च कणसे लागून हिरवागार गालीचा पसरल्याचे चित्र दिसत आहे. उत्पादन खर्च तुलनेने नियंत्रित राहतो आणि काढणीच्या वेळी हवामान स्थिर असल्याने नुकसानही कमी होते, असे शेतकरी सांगत आहेत.

चांगले उत्पन्न येणार

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी बाजरी हा शाश्वत आणि अल्पजोखमीचा पर्याय ठरत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. मेहनत, नियोजन आणि योग्य वेळ साधल्यास शेतकऱ्यांच्या हातात यंदा चांगले उत्पन्न येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT