Sugarcane juice is popular in the market in the hot weather
आन्वा, पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून उन्हाचा पारा वाढला असून मे महिन्यात अंगाची लाहीलाही होते आहे. उन वाढलेले पाहून उसाचा रस, लिंबूपाणी, टरबूज आदींना मागणी वाढली असून गल्लीबोळात दुकाने थाटली गेली आहेत.
उन्हाबरोबर काही तास उकाडाही जाणवत आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच उन पडत असून दपारच्यावेळी दमट वातावरणही काहीवेळ जाणवत आहे. त्यामुळे लहान मुले व आजारी व्यक्तींना त्रास जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे थंड पेयाला मागणी वाढली आहे.
शहरासह ग्रामीण बसस्थानक परिसर, आठवडी बाजार, मुख्य बाज ारपेठ रोड आदी भागात आईस्क्रीम, उसाचा रस आदी दुकाने थाटली असून टरबूज, खरबुजांची गाडे छोट्या विक्रेत्यांनी मांडली आहेत. शहरात छोट्या स्टॉलसोबत रसवंती गाडेही उभी राहिलेली पाहावयास मिळत आहेत. महिनाभरापासून तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणेही कठीण होऊन झाले आहे.
उष्णतेचे प्रमाण लक्षात घेऊन ज्येष्ठ मंडळी लिंबूपाणी व नारळाच्या पाण्याला पसंती देत आहेत. दुपारच्या वेळी उन्हामुळे बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ कमी दिसत आहे. बाजारपेठेत ही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर रसवंतीगृहाशेजारी लहान-मोठ्यांची गर्दी दिसत आहे.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हे करा
शक्यतो दुपारी १२ ते ३ या दरम्यान उन्हात बाहेर पडू नये. सातत्याने पाणी पित राहावे. गॉगल, छत्री-टोपी घालावी किंवा मोठ्या पांढऱ्या सुती रुमालाने डोके झाकावे. मेहनतीची कामे उन्हात करू नयेत. मासेवन, चहा, कॉफी, कृत्रिम सोडावॉटर पेये घेणे टाळावे.
साखर-मिठाच्या योग्य मिश्रणाचे 'ओरल डिहायड्रेशन सोल्यूशन ओआरएस' नियमित घ्यावे. चांगला प्रथिनयुक्त आहार घ्यावा. शिळे अन्न खाणे टाळावे, ताक, लस्सी, लिंबू सरबत, आदी घरगुती पेये प्यावीत.