Soybean : सोयाबीनचे एकरी एक क्विंटलचे उत्पादन file photo
जालना

Soybean : सोयाबीनचे एकरी एक क्विंटलचे उत्पादन

पिंपळगाव रेणुकाईकातील चित्र, शेंगात दाणेच नाहीत, लागवड खर्चात सहा हजार रुपयांचा तोटा

पुढारी वृत्तसेवा

Soybean yield of one quintal per acre

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पिंपळगाव परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीनला शेंगा तर भरपूर लागल्या, पण त्या शेंगांमध्ये दाणेच तयार झाले नसल्याचे एकरी एक क्विंटलचे उत्पादन झाले आहे. यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

पिंपळगाव रेणुकाई भागात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन काढणीला वेग आला आहे. एका दिवसात चार ते पाच मजूर लावून शेतकरी सोयाबीन जमा करत आहेत. मात्र मळणी केल्यानंतर पदरी निराशाच येत आहे. ज्या शेंगांमध्ये दाणे आहेत. त्यातही दाणा अतिशय बारीक आणि चोपा पडला आहे. बाजारात अशा बारीक दाण्याला मागणी नसल्याने व्यापारीही माल घेत नाहीत.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एका एकरात केवळ एक ते सव्वा क्विंटल इतकेच सोयाबीन निघत आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन चार ते पाच क्विंटलपर्यंत होते. पावसाचा खंड, त्यानंतर सततचा पाऊस आणि शेवटी दाणा भरण्याच्या अवस्थेत पडलेला ताण यामुळे हे नुकसान झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. वेग या जातीच्या सोयाबीनमध्ये हा प्रकार दिसला.

दोन एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोंगणी करून सोयाबीनचे खळे केले. दोन एकरांत फक्त दोनच क्विंटल सोयाबीन झाले आहे. लागवड खर्चही निघाला नाही. यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीऐवजी बिगारी काम केल्यास सहाशे रुपये रोज मिळतो. शासन व निसर्गाकडून शेतकरी वर्गाची थट्टा करण्यात येत आहे.
- गजानन नरवाडे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT