Sowing of wheat, gram and maize in Pimpalgaon Renukai area
पिंपळगाव रैणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गहू हरभरा व मका या रब्बीच्या पिकांची पेरणी जोमात सुरु आहे. यंदा थंडी चांगली पडत असल्याने रब्बी पिकाना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान बदलत्या वातावरणामुळे हरभरा व तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
यावर्षी खरीप हंगामात जोरदार पाऊस पडल्याने विहिरी व बोअरला चांगले पाणी आहे. रब्बी हंगामात थंडीही चांगली पडत असल्यामुळे त्याचा फायदा रब्बीच्या पिकाना होणार आहे. योग्य हवामानामुळे पिकांमध्ये काही ठिकाणी हरभरा पिकाला फुले लागण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी कापुस काढलेल्या शेतात उशीराने पेरणी होतांना दिसत आहे.
थंडीची लाट गहु पिकांसाठी पोषक ठरणार आहे. शेतकरी सध्या निंदनी व खुरपणी करण्यात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात मजुरांची टंचाई जाणवत असल्याने मजुरांची पळवापळवी सुरु आहे. अनेक ठिकाणी शेतकरी व त्याचे कुटुंबीय शेतात काम करतांना दिसत आहे. मजुरीचे वाढते दर व शेती मालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरतांना दिसत आहे.
सोयाबीन व कापसाला कमी भाव मिळत असतांनाच तुर पिकांवर आळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पाण्यात गेल्यानंतर रब्बीची आशा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता किडीच्या प्रादुर्भावाचे संकट आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात हरभरा ३५० हेक्टर, गहू २१०, मका 66 १५० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी अळीसाठी इमामेक्टीन ५ ग्रॅम व डायथेन एम ४५ या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे अळी व मर रोगाचे नियंत्रण होईल.- नंदकुमार पायघन, कृषी सहायक