Solve basic civic problems in Bhokardan city
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा नगरपालिकेने शहरातील मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांना निवेदन देण्यात आले. पाईप लाईन फुटल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे.
ही पाईपलाईन दुरुस्त करुन नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, नगरपरिषदेने सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांचे थकीत असलेले उपदान राशी, रजा रोखीकरण, १०.२०.३० पदले व्रत्ती फरक व निवृत्ती वेतन फरक तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. गणपती विसर्जनच्या ठिकाणच्या हौदाची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगराध्यक्ष मुकेश चिने, माजी नगराध्यक्षा आशा माळी, सुरेश शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक मोरे, विजय मतकर, आदींच्या सह्या आहेत.
शहरातील पथदिवे बंद पडले आहे. यामुळे ये जा करताना महिला, मुले, मुलींना अंधाराचा सामाना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे रात्री सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. परिणामी, स्थानिक नागरिकांना अंधारातून ये-जा करताना भीती निर्माण झाली आहे. पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावे. शहरामध्ये ठिकठिकाणी पसरलेली घाण साफ करुन तातडीने धूळ फवारणी करण्यात यावी.